काँग्रेस पार्टीने नुकताच 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांचा जाहीरनामा ( congress manifesto 2024 ) प्रसिद्ध केला आहे. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी सह पक्षाचे ज्येष्ठ नेते यावेळी उपस्थित होते. त्यामध्ये इन्कम टॅक्स आणि पगारदार व्यक्तीं संदर्भात अनेक आश्वासने दिली आहेत.
पाहूया यापैकी मुख्य घोषणा कोणत्या..
1 इन्कम टॅक्स वाढणार नाही.
2024 लोकसभेमध्ये जर काँग्रेस सत्तेत आली तर त्याच्या संपूर्ण कार्यकाळात इन्कम टॅक्स दर कधीही वाढू देणार नाही, हे दर स्थिर राहण्याबाबत आश्वासन या जाहीरनाम्यात दिले आहे. या घोषणेचा उद्देश पगारदार व्यक्तींना वाढत्या कर दराच्या ओझ्याचा सामना न करता त्यांच्या आर्थिक नियोजनात स्पष्टता आणणे हे आहे.
2 आरक्षण मर्यादा वाढवणार.
‘न्याय पत्र’ नावाच्या त्यांच्या जाहीरनाम्यात संपूर्ण देशामध्ये जातिगत जनगणना करून त्यानुसार सामाजिक न्याय मिळवून देण्याकरिता SC, ST आणि OBC प्रवर्गातील आरक्षणावरील मर्यादा वाढवून 50 टक्के पेक्षा जास्त करण्यासंदर्भात घटनादुरुस्ती करणार असल्याचा स्पष्ट उल्लेख त्यामध्ये केलेला आहे.
3 ॲप्रेंटिसशिपचा अधिकार.
प्रत्येक डिप्लोमा धारक किंवा 25 वर्षांखालील पदवीधरांना एक वर्षाची अप्रेंटिसशिप मिळवण्याचा अधिकार राहणार आहे. त्यामुळे त्यांना जॉब मिळवण्यासाठी पूर्व अनुभव तर मिळेलच सोबतच अप्रेंटीसशिप दरम्यान 1 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदतदेखील दिली जाणार आहे. ज्यामुळे नोकरी मिळवणे सोपे होईल असे त्यांचे म्हणणे आहे.
4 संपूर्ण स्टुडन्ट लोन होणार माफ.
जाहीरनाम्यातील ( congress manifesto 2024 ) मुख्य घोषणांपैकी एक म्हणजे ज्या काही विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कर्ज घेतलेले आहे ते संपूर्णपणे माफ केले जाणार आहे. यामध्ये व्याजाचाही समावेश असेल आणि बँकांना त्यासाठी आर्थिक भरपाई दिली जाईल असे जाहीरनाम्यात म्हटले आहे.
5. गरीब महिलांना मिळणार वर्षाला 1 लाख रुपये.
‘नारी न्याय’ योजने अंतर्गत गरीब कुटुंबातील महिलांना ‘महालक्ष्मी’ हमी अंतर्गत वर्षाला एक लाख रुपये देणार आहेत जेणे करून महिला सक्षमीकरण होईल असा त्याचा उद्देश आहे.
सोबतच 30 लाख सरकारी नोकऱ्या देणे, सरकारी नोकरीसाठी दिल्या जाणाऱ्या परीक्षेची फिस माफ करणे, ‘लेबर जस्टिस’ अंतर्गत कामगारांना आरोग्याचा हक्क, रोजगार हमी अंतर्गत प्रतिदिन किमान 400 रुपये वेतन, शहरात राहणाऱ्या लोकांना रोजगार हमी देणे असे अनेक आश्वासने या जाहीरनाम्यात नमूद केले आहे.