Sovereign Gold Bond – सॉवरीन गोल्ड बाँड | सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा सर्वोत्कृष्ट मार्ग – जाणून घ्या सर्वकाही..

सोने विकत घेणे ही अनेक लोकांसाठी गुंतवणूक करण्याचा पारंपारिक आणि आवडता मार्ग आहे.  यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर लोकं सहसा, सोन्याची नानी, बिस्कीट, 24 कॅरेट सोन्याची रींग किंवा दागिने विकत घेतात पण यामध्ये मेकिंग चार्ज, शुद्धतेचा प्रश्न या गोष्टी असतातच आणि बऱ्याच ठिकाणी परत विकायचे म्हटल्यास भावफरक पण लागतो म्हणजे काहीतरी नुकसान होणे हे नक्की आणि यावर दिलेल्या GST चे नुकसान हे तर ठरलेलच. जर या सर्व गोष्टीपासून मुक्त, एखाद्याला सोन्यात फक्त गुंतवणूकच करायची असेल ती पण दीर्घ कालावधीसाठी तर भारतात सोन्यात गुंतवणूक करण्याचा एक आधुनिक आणि उत्कृष्ट मार्ग म्हणजे सॉवरीन गोल्ड बाँड्स ( Sovereign Gold Bond ). सरकारने जारी केलेले हे रोखे, सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा एक उत्कृष्ट पर्याय देतात.

* सॉवरीन गोल्ड बाँड्स (Sovereign Gold Bond) म्हणजे काय :

सॉवरीन गोल्ड बाँड्स (SGB) ही भारत सरकारने जारी केलेले एक बाँड आहे ज्यामध्ये प्रत्यक्ष सोने खरेदी करण्याऐवजी, गुंतवणूकदार हे रोखे खरेदी करू शकतात, जे सोन्याच्या बाजारातील किमतीशी समतुल्य असतात. हे सोन्यामध्ये गुंतवणुकीसाठी सुरक्षित आणि सोयीस्कर मार्ग आहे. या बाँड ची किंमत ठरवण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. रिझर्व बँक ऑफ इंडिया ( RBI) ज्या दिवशी हे बाँड विक्रीसाठी उपलब्ध करते त्या अगोदरच्या 3 दिवसाच्या ‘इंडियन बुलियन आणि ज्वेलरी असोसिएशन ऑफ इंडिया’ यांच्याद्वारे जाहीर केलेल्या बाजारातील सोन्याच्या भावाची सरासरी ही त्या बाँड मधील एका ग्राम ची किंमत असते.

* सॉवरीन गोल्ड बाँड्स (SGB) ची वैशिष्ट्ये :

सॉवरीन गोल्ड बाँड्स (Sovereign Gold Bond) कोणतीही खाजगी संस्था किंवा बँकांद्वारे जारी केले जात नाहीत तर त्यांना सुरक्षित आणि विश्वासार्ह गुंतवणुकीचा पर्याय म्हणून भारत सरकारच भारतीय रिसर्व बँकेतर्फे (RBI) हे बाँड इतर बँकेद्वारे सर्वसामान्य ग्राहकांना उपलब्ध करून देते. SGB हे ​​शेड्युल्ड कमर्शियल बँक, नियुक्त पोस्ट ऑफिस आणि NSE आणि BSE सारख्या मान्यताप्राप्त स्टॉक एक्स्चेंजमधून खरेदी केले जाऊ शकतात.

* सॉवरीन गोल्ड बाँड्समध्ये गुंतवणूक कशी करावी :

ऑनलाइन आणि ऑफलाइन मोड:

आपण इंटरनेट बँकिंगद्वारे SGB साठी ऑनलाइन अर्ज करू शकता किंवा ऑफलाइन अर्जांसाठी बँकांच्या नियुक्त शाखांना भेट देऊ शकता हे बाँड डिमॅट अकाउंट मधून पण तुम्ही घेऊ शकता परंतु इतर कोणत्याही आर्थिक साधनांप्रमाणेच, गुंतवणूकदारांना SGB मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमचा KYC पूर्ण करणे आवश्यक आहे. यामध्ये तुम्हाला कमीतकमी 1 ग्राम आणि जास्तीत जास्त 4 किलो पर्यंत सोनं विकत घेऊ शकता.

* SGB मधील गुंतवणुकीचे फायदे :

याचे फायदे खालीलप्रमाणे सांगता येईल..

1 तुमची सोने जपून ठेवण्याची रिस्क आणि लॉकर चा खर्च वाचतो.

2 सोने गुंतवणूक म्हणून जरी घ्याल तरी GST ही द्यावीच लागते त्यामुळे यामध्ये तुमची GST वाचते.

3 सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे तुम्हाला गुंतवणुकीवर वार्षिक 2.5 टक्के व्याज मिळतो. म्हणजेच सोन्याचा भाव काहीही असला तरी अडीच टक्के व्याज मात्र निश्चित.

4 हे बाँड बँकेद्वारे ऑनलाईन घेतल्यास प्रति ग्राम भावामध्ये 50 रुपये अतिरिक्त सूट मिळते.

5 मॅच्युरिटीनंतर जो काही नफा तुम्हाला होईल तो पूर्णपणे करमुक्त राहील परंतु दरवर्षी मिळणारे व्याज हे मात्र करपात्र असेल.

* मॅचुरीटी कालावधी :

सॉवरीन गोल्ड बाँड्स (Sovereign Gold Bond) ची मॅच्युरिटी ही घेतल्यापासून 8 वर्षांची असते, तरी पाचव्या वर्षानंतर तुम्ही याला कधीही रीडिम करू शकता आणि ज्यावेळेस तुम्ही याला रीडिम करता त्यावेळेस सोन्याचा मार्केटमधील जो काही भाव असेल तो तुम्हाला मिळेल आणि सर्व रक्कम तुमच्या संबंधित बँक खात्यामध्ये जमा होईल. जर तुम्हाला पैशांची आवश्यकता असेलच तर स्टॉक एक्सचेंजवर डिमॅट अकाउंट मधून तुम्ही हा बाँड विकू शकता, पण यामध्ये तुम्हाला हे बाँड थोड्या कमी किमतीत विकावं लागेल एवढच.

* पात्रता :

व्यक्ती, हिंदू अविभक्त कुटुंबे (HUF), ट्रस्ट आणि धर्मदाय संस्था सॉवरीन गोल्ड बाँड्स (Sovereign Gold Bond) मध्ये गुंतवणूक करण्यास पात्र आहेत.

सॉवरीन गोल्ड बाँड्स (SGB) हे व्यक्तींना सोने प्रत्यक्षात न घेता सोन्यात गुंतवणूक करण्याचा एक सोयीस्कर आणि सुरक्षित मार्ग प्रदान करतात. व्याज उत्पन्न, कर लाभ आणि तरलता पर्याय यांसारख्या वैशिष्ट्यांसह, त्यांच्या गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये विविधता आणू पाहणाऱ्यांसाठी SGB हे एक लोकप्रिय पर्याय बनला आहे.

Leave a comment

Exit mobile version